बीड जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती आहे ?

अंबाजोगाई- महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाचे काम युद्धपातळीवर सूरू झाले आहे.भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे,तेथे भूसंपादन ची प्रक्रिया सूरू आहे.दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध पण झाला.
आता बीड जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाची लांबी समोर आलेली आहे.
बीड जिल्ह्यातील पूर्वेकडून जाणाऱ्या या महामार्गात मुख्यत्वे परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ महादेव व अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर जोडले जाण्याचा उद्देश आहे.हा महामार्ग या दोन तालुक्यांमधूनच जातो आहे.
जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी येथील सर्व गावांमधील लांबी ही साधारणपणे 39 किमी असणार आहेत. हा महामार्ग बीडमधून जाताना 39 अंतर पार करून धाराशिव जिल्ह्यातून पुढे गोव्याच्या दिशेने जाणार आहे.
राज्यातील विदर्भाला कोकणाशी थेट जोडणाऱ्या गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला आता गती मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बनणाऱ्या या द्रुतगती मार्गाच्या सुधारित आराखड्याला एप्रिल 2026 मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या मार्गामुळे सध्या 18 ते 20 तास लागणारा नागपूर-गोवा प्रवास अवघ्या 8 ते 10 तासांत पूर्ण होणार आहे. पूर्णतः ग्रीनफिल्ड स्वरूपाचा हा 856 किलोमीटर लांबीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पावनार येथून सुरू होऊन गोव्याजवळील पत्रादेवी पर्यंत जाणार आहे.
महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतील 40 हून अधिक तालुके आणि 400 गावे या मार्गाने जोडली जाणार आहेत. कोल्हापूर-सांगली भागातील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मार्गात बदल करण्यात आला असून आता सातारा जिल्ह्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर मार्गे हा रस्ता जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी 8 हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट ते तिप्पट मोबदला देण्यात येणार आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून निविदा प्रक्रिया 2026 अखेर पूर्ण करून 2027 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे कारण हा मार्ग माहूरच्या रेणुका माता, तुळजापूरच्या भवानी माता आणि कोल्हापूरच्या अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तीन शक्तिपीठांना स्पर्श करून जातो. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. एकूण 21 धार्मिक स्थळे या मार्गावर जोडली जाणार आहेत. सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात सहा बोगद्यांचा समावेश आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी टाळून वाहने थेट कोकणात जाता येणार आहेत. शेतीमालाची जलद वाहतूक, औद्योगिक विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे या महामार्गाचे प्रमुख फायदे असणार आहेत. एमएसआरडीसीच्या माहितीनुसार 2032 पर्यंत हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असा अंदाज आहे.

