अंबाजोगाईच्या डॉ.कमलाकर राऊत यांचे राष्ट्रभाषा पंडित परीक्षेत यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालय माध्यमिक विभागातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, साहित्यिक, वक्ते, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार डॉ.कमलाकर कोंडिबा राऊत यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा पंडित पदवी परीक्षेत यशस्विता प्राप्त केली आहे.

डॉ.राऊत यांनी सुरूवातीला आय.टी.आय.फिटरच्या आधारे धूत कॉम्पॅक व बजाज कंपनीत कामगार म्हणून कार्य केले. एच.एस.सी., डी.एड. या शैक्षणिक अर्हतेवर १९९७ साली त्यांनी सेवेला प्रारंभ करताच पुढे बहि:स्थ सलग शिक्षण घेऊन एम.ए., एम.एड.,नेट, पीएच.डी., डी.एस.एम., एन.डी – २, एल.टी.सी, साहित्यभूषण, राष्ट्रभाषा प्रवीण ही शैक्षणिक अर्हता धारण केली. नुकतीच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.), नवी दिल्ली यांच्या वतीने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (सी.टी.ई.टी.) दोन्ही परीक्षेत यशस्विता प्राप्त केली आहे. डॉ.राऊत यांची ३ पुस्तके, संपादित पुस्तके, विशेषांक, स्मरणिका, ४३ शोधनिबंध आणि ५०० पेक्षा अधिक लेख, कविता, कथा आजपावेतो प्रकाशित झाल्या आहेत. डॉ.राऊत यांना लेखनासाठी याआधी विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील पारितोषिके आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्वासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने डॉ.राऊत यांना ५ सप्टेंबर २०१७ रोजी शिक्षक दिनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, संशोधन या क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वासाठी, राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रभाषा पंडित परीक्षेतील सदरील यशाबाबत डॉ.राऊत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी श्री योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी असून याच विद्यालयात अध्यापन करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटत आला आहे. शिक्षकाची भूमिका ही स्वाभाविक, चैतन्यशील आणि चैतन्यदायी असून दैनंदिन परिणामकारक व स्फूर्तीदायी अध्यापनासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पदव्याचा, प्राप्त शिक्षणाचा खूप उपयोग होत आला आहे. सदरील यशस्वितेसाठी डॉ.कमलाकर राऊत यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर, सर्व सन्माननीय संचालक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए.आर.पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती, बंधू विष्णू राऊत, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

