यशस्वी उद्योजक होण्यासाठी तरूणांनी सकारात्मक दृष्टीकोन, जिद्द व चिकाटी अंगीकारावी – उद्योजक डॉ.छगन राठोड
कृषिदूत व कृषिकन्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना सूचवाव्यात – अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे
यशस्वी करिअरसाठी प्रभावी संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास आवश्यक – सर डॉ.नागेश जोंधळे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) कृषि महाविद्यालय, लातूर येथे सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि ग्रामीण उद्योजगता जागरूकता व विकास योजना अभिमुखता कार्यक्रम तसेच व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

कृषि महाविद्यालयातील एकूण १२५ विद्यार्थी कृषिदूत व कृषिकन्या म्हणुन नियुक्त केले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे होते तर व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून सनएज मार्केटींग प्रायव्हेट लिमीटेडचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक डॉ.छगनजी राठोड आणि आय.ई. सेंटर प्रो चे संचालक तथा प्रेरणादायी वक्ते सर डॉ.नागेश जोंधळे हे उपस्थित होते. यावेळी कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना डॉ.छगन राठोड यांनी बहुमोल मार्गदर्शन करताना सांगितले की, या तरूण वयातच एखादा विचार एखादा निर्णय आपले जीवनमान उंचावणारा व यशस्वी ठरणारा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार, जिद्द व चिकाटी अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपण घेत असलेल्या शिक्षण व त्यासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित केल्यास आपणास यश हमखास मिळते व त्यासाठी अशा कार्यशाळेमध्ये आपला सक्रिय सहभाग होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तत्पूर्वी आई सेंटर प्रो सेंटरचे संचालक तथा प्रेरणादायी वक्ते सर डॉ.नागेश जोंधळे यांनी व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्यवृध्दीसाठी आवश्यक गुण व ते कसे विकसीत करावेत यावर मार्गदर्शन करताना आजच्या या २१ व्या शतकातील तरूणांना स्टेज करेज, प्रभावी संभाषण कौशल्ये, पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, ग्रामीण तथा शहरी भागातील शेतकरी व व्यावसायिकांसोबत शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचे विचार मांडत असताना आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्याची तसेच मिळालेल्या संधीचे सोने करण्याची गरज असून त्यातूनच आपल्या यशस्वी करिअरची दिशा ठरणार असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, कृषिदूत व कृषिकन्या यांनी ग्रामीण जीवनाशी समरूप होत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्यांना कमी खर्चिक व पर्यावरणपूरक उपाययोजना सुचविण्यात महत्वाची भूमिका बजवावी. तसेच त्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या अनुभवातून समृध्द झालेले ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी विविध विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर डॉ.व्यंकट जगताप, संदीप अंबेसंगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.प्रभाकर आडसूळ, डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ.वैभव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दयानंद मोरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.अनंत शिंदे यांनी मानले.

