दहावीत ८९ टक्के गुण मिळवणाऱ्या अंबाजोगाई च्या सदफ शेख हिचा सत्कार; राजेंद्र घोडके यांनी स्वीकारले पुढील शिक्षणाचे पालकत्व
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील गांधीनगर येथील सदफ शेख हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ८९ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. फातिमा उर्दू माध्यमिक शाळा येथील विद्यार्थिनी असलेल्या सदफने शाळेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कुटुंबासह शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

सदफच्या या यशाबद्दल राजेंद्र घोडके यांनी तिचा तसेच तिच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करून गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी सदफच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याची घोषणा केली. उच्च शिक्षणासाठी तिचे पालकत्व स्वीकारत त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजापुढे एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे.
या निर्णयामुळे शेख कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदफ शेख हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह शिक्षकांना दिले. तसेच राजेंद्र घोडके यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मिळालेला आधार आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना तिने व्यक्त केली.
विशेष म्हणजे, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या भावनेतून राजेंद्र घोडके सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
सदफ शेख हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

