समाजभूषण मिलिंदसागर पुरस्काराने ऍड.सुनील सौंदरमल यांचा सन्मान होणार
अंबाजोगाई (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता आयोजित भव्य कार्यक्रमात समाजभूषण मिलिंदसागर पुरस्कार प्रदान करून ऍड.सुनील काशिनाथ सौंदरमल यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मिलिंदसागर युवा प्रतिष्ठान, फुलेनगर, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा) हे राहणार असून, उद्घाटक म्हणून खासदार बजरंग बप्पा सोनवणे (बीड लोकसभा सदस्य) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून हारूणभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, अंकुश इंगळे, सौ.अंजलीताई घाडगे, सय्यद शरीफ, भाऊसाहेब गुंड, बालाजी जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांचा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. ऍड.सुनील काशिनाथ सौंदरमल यांनी सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, आर्थिक साक्षरतेसाठी तसेच धार्मिक व समाजोपयोगी क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर रात्री ११ वाजता भिमज्योत रॅली काढण्यात येणार असून, ही रॅली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते फुलेनगर चौक, केज येथे काढण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल विविधस्तरांतून ऍड.सुनील काशिनाथ सौंदरमल यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

