डॉ.कमलाकर राऊत सी.टी.ई.टी.च्या दोन्ही परीक्षेत यशस्वी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालय माध्यमिक विभागातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, साहित्यिक, वक्ते, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार डॉ.कमलाकर कोंडिबा राऊत यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस. ई.), नवी दिल्ली यांच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सी.टी.ई.टी.) सुयश संपादन केले आहे. विशेष म्हणजे डॉ.राऊत या परीक्षेतील, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प्रायमरी स्टेज आणि एलिमेंटरी स्टेज या दोन्ही परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरले आहेत.

तसेचडॉ.राऊत हे स्वतः आजारी असतानाही त्यांनी केवळ १२ दिवस अभ्यास करून, पेपर्स देऊन यशस्विता प्राप्त केली आहे. राऊत यांनी सुरूवातीला आय.टी.आय. फिटरच्या आधारे धूत कॉम्पॅक व बजाज कंपनीत कामगार म्हणून कार्य केले असून खेडोपाडी फोटोग्राफी केली आहे. त्यानंतर एच.एस.सी.,डी.एड. या शैक्षणिक अर्हतेवर, पात्रतेवर १९९७ साली ते श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचे मंदिर विभागात २००८ पर्यंत अध्यापन केले, त्यानंतर ते माध्यमिक विभागात ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इतिहास, व्यक्तिमत्त्व विकास, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र इत्यादी विषयांचे अध्यापन करीत आले आहेत आणि विद्यार्थ्यांचा अध्यापनासह विविध स्पर्धा, परीक्षा, उपक्रमांद्वारे सर्वांगीण विकास करीत आले आहेत. डॉ.राऊत यांनी नोकरी प्रारंभ करताच पुढे बहि:स्थ सलग शिक्षण घेऊन एम.ए.,एम.एड., नेट,पीएच.डी.,डी.एस.एम.,एन.डी – २, एल.टी.सी, साहित्यभूषण, राष्ट्रभाषा प्रवीण ही शैक्षणिक, अर्हता धारण केली आहे. डॉ.राऊत यांची ३ पुस्तके, संपादित पुस्तके, विशेषांक,४३ शोधनिबंध आणि ५०० पेक्षा अधिक लेख आजपावेतो प्रकाशित झाले आहेत. डॉ.राऊत यांना लेखनासाठी याआधी विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्वासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने डॉ.राऊत यांना ५ सप्टेंबर २०१७ रोजी, शिक्षक दिनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, संशोधन या क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वासाठी, राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.राऊत यांनी आपल्या व्याख्यानांतून असंख्य व्यक्तींना शाकाहारी आणि निर्व्यसनी केले आहे, तसेच त्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून २० बंधु-भगिनींचे प्राण वाचविण्यासाठी मोलाचे साह्य केले आहे. तसेच त्यांनी ५००० पेक्षा अधिक व्यक्तींना विविध प्रसंगी पुस्तके भेट देऊन, असंख्य व्यक्तींना वाचनासाठी प्रोत्साहित करून वाचन संस्कृती अभियानात मोलाचे कार्य केले आहे.सी.टी.ई.टी.च्या दोन्ही परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्यानंतर डॉ.राऊत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी असून याच विद्यालयात अध्यापन करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.सी.टी.ई.टी. परीक्षेत कमी कालावधीत अभ्यास करून उत्तीर्ण होण्यामध्ये, जोपासलेली अभ्यासूवृत्ती, ज्ञानदानाची तळमळ, व्यासंग, वस्तुनिष्ठ व सूक्ष्म विचार, सुसंगत तर्क, समयसूचकता, सहकाऱ्यांशी केलेली चर्चा आणि वरिष्ठांचे प्रोत्साहन मला उपयुक्त ठरले आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत प्रश्नाच्या चार पर्यायांपैकी दोन पर्यायांचा प्रश्नाशी काहीही संबंध नसतो हे ओळखावे आणि उर्वरित दोन पर्यायांपैकी एक पर्याय संभ्रम निर्माण करतो, त्यांतील योग्य पर्याय कोणता हे स्वतःला दोनदा विचारावे, तेव्हा क्लिक होते आणि लागलीच त्या पर्यायाचे वर्तुळ गडद करावे. सदरील यशस्वितेसाठी डॉ.राऊत यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर, सर्व सन्माननीय संचालक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए.आर.पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती, विष्णू राऊत, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

