अंबाजोगाई (प्रतिनिधी)जिद्द, समर्पण आणि शिक्षणाप्रती निष्ठा यांच्या बळावर यशाची नवी उंची गाठत अंबाजोगाई येथील उपक्रमशील शिक्षक रविकुमार अर्जुन शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावून तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचा नवा अध्याय लिहिला आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना रविवारी प्रदान करण्यात आला.

येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी नूतन विद्यालय (प्राथमिक विभाग, मेडिकल परिसर) येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक रविकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोपासना केल्यामुळे त्यांची सदर पुरस्कारासाठी राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र तर्फे पुणे येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात रविवार, दिनांक २९ मार्च रोजी एज्युकेशन आयकॉन समीट-२०२६ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ.शर्मिला बाबर, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर तसेच शिक्षण मंडळ सभापती नानासाहेब शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या हस्ते शिक्षक रविकुमार शिंदे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर व शिक्षणतज्ज्ञांनी टाळ्यांच्या गजरात शिक्षक शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून अत्यंत पारदर्शक व काटेकोर निवड प्रक्रियेद्वारे या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. अंबाजोगाई तालुक्यातून शिक्षक रविकुमार शिंदे यांची निवड करताना उत्कृष्ट अध्यापनशैली, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नैतिक मूल्यांची जपणूक, तसेच विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यांच्या बळावर हा मानाचा किताब शिक्षक शिंदे यांनी पटकावला. शिक्षक शिंदे हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य, सकारात्मक बदल विशेष उल्लेखनीय ठरत आहे. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे संस्था व शाळेचा लौकिक ही सातत्याने वाढत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक रविकुमार शिंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास, संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ.शैलेष वैद्य, कार्यकारी उपाध्यक्ष जगदीश चौसाळकर, संचालक पाशुमियाँ सय्यद व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक खं.भ.नांदगावकर, विभागप्रमुख गोडसे, शिक्षक प्रतिनिधी अनंत जोशी, शिक्षक प्रतिनिधी मंगल पतंगे, सहकारी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले असून भविष्यात ही ते शिक्षण क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

