परळी वैजनाथ व अंबाजोगाई येथील जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे – नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ : प्रतिनिधी….
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परळी वैजनाथ येथे तसेच अंबाजोगाई शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. दिवसभर महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारे वातावरण निर्माण झाले. या विविध कार्यक्रमांना परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती लावून महिलांचा गौरव केला. ठिकठिकाणी बोलतांना त्यांनी नारीशक्तीचा गौरव करत समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असुन त्यांना संधी, प्रोत्साहन मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले.

परळी वैजनाथ येथील पतंजली योग सेवा समितीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व नागरी सत्कार सोहळ्यास नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी न.प. सभापती अंजली माळी, नगरसेविका शिल्पा लाहोटी, महिला संघटक सपना बियाणी, भाजप शहराध्यक्ष उमाताई समशेट्टे, राधाकृष्ण महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा ज्योती नागपूरकर, इनरव्हिल क्लब च्या अॅड. शुभांगी गित्ते,, माहेश्वरी महिला मंडळाच्या दीपा बंग, जैन महिला मंडळाच्या लता तातेड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्वर्गीय सौ. वंदना नागनाथ पारसेवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सन्मान गौरव सोहळ्यासही नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने नागनाथ पारसेवार यांनी त्यांचा सन्मान केला. जिजामाता गार्डन क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष उमाताई समशेट्टे व आर्यवैश्य महिला मंडळाच्या सौ. सविता रमेश देवसेटवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिजलाल मुंदडा तर प्रमुख पाहुणे म्हणून विकासराव डुबे उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मंदिर परिसरात रेल्वे वेळापत्रकाचे होर्डिंग्जही लावण्यात आले.

वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. बालाजी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व संशोधन प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने आयोजित मोफत थायरॉईड तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक डॉ. शालिनीताई कराड, डॉ. बालासाहेब कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शक्तीकुंज प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, सौ. अनिता इंगळे, सौ. मनीषा अवचार, सौ. दिपाली मोटे, सौ. प्रतिमा राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयातही महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी उपस्थित होत्या.स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.चे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य होते. यावेळी भा.शि.प्र.केंद्रिय सदस्या डॉ. कल्पना चौसाळकर, सौ. वर्षाताई मुंडे, अंबाजोगाई येथील नगरसेविका सौ. सुचिता देशपांडे, क्षमता वर्धन अकॅडमीच्या संचालिका शितल कोदरकर, महाविद्यालय विकास समिती सदस्या सौ. संगीता धर्मराव, योगेश्वरी देवल कमेटी सदस्या सौ. पूजा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी, तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. रोहिणी अंकुश व प्राचार्य डॉ. दीपक फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सांगितले की, समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण, उद्योग, प्रशासन, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. महिलांना संधी व प्रोत्साहन मिळाल्यास त्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. महिला सशक्तीकरणासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

