माकेगावात फटाके वाजवून आनंद उत्सव
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील शेतकऱ्याचा मुलगा अजित देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल फटाके वाजवून पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
आपल्या स्वप्नांना कष्टाची जोड असेल तर यशाची पायरी नक्कीच गाठता येते हेच माकेगाव येथील प्रगतिशील शेतकरी जयसिंगराव देशमुख यांच्या मुलाने करून दाखवून दिले आहे.नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेत अजित देशमुख यांनी हे यश मिळवले आहे.अगदी कमी वयात माकेगावातून पहिले पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे. अजित देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे माध्यमिक शिक्षण ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे महाविद्यालय येथे तर पदवीचे शिक्षण लातूर येथे झाले.अजित देशमुख हे अगदी बालपणापासून हुशार जिद्दी आणि चिकाटीबाज असून अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र प्रचंड अभ्यास मेहनत घेत आपले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. अजित देशमुख यांनी आपल्या आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पोलीस उपनिरीक्षक होऊन पूर्ण केले. पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अजित देशमुख यांचे अंबाजोगाई तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी अभिनंदन करत गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला.

