■ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आचरणाची समाजाला खरी गरज- डॉ. शिवाजी सावळकर
■ ढोर समाजाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आज समाजाला खरी गरज असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ शिवाजी सावळकर यांनी व्यक्त केले. ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अंबाजोगाई शहरातील ढोर समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रचे प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ञ डॉ शिवाजी सावळकर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमात आदर्श शिक्षक तुळशीराम गजाकोष, महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता किशोर सावळकर, युवा कार्यकर्ते सचिन इंगळे, लिंबाजी खरटमोल, गौतम शिंदे, पत्रकार गोविंद खरटमोल, विलास इंगळे, गंगाधर सावळकर यांच्यासह अनेक महिला व युवक उपस्थित होते.

प्रारंभी बोधिसत्व गौतम बुद्ध , डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इंगळे यांनी केले. अंबाजोगाई शहर व परिसरात ढोर समाज हा चार दिशेला विखुरला गेला आहे. अशा या विखुरलेल्या ढोर समाजाला एकत्र व एकसंघ आणून त्यांना आजच्या वास्तव परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने एक छोटासा प्रयत्न केला.

या जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले बालरोगतज्ञ डॉ शिवाजी सावळकर यांनी ढोर समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहन केले. युवकांना व्यसनापासून दूर राहून शिक्षणाची कास धरून आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्याचा सल्ला देखील डॉ सावळकर यांनी दिला. आज डॉ बाबासाहेब नसते तर राष्ट्रातील अस्पृश्यता नष्ट झाली नसती. त्यामुळे त्यांनी देशाला
दिलेल्या संविधानाच्या आदर करून त्यानुसारच आचरण केले तर समाजाचा उद्धार होईल असेही मत डॉ शिवाजी सावळकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता किशोर सावळकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आदर्श शिक्षक तुळशीराम गजाकोष यांनी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, अस्पृश्य, दिन दुबळ्यांसाठी केलेल्या कार्यामुळेच उध्दारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असे म्हटले जाते. ढोर समाजातील युवकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी गरज असल्याचे यावेळी तुळशीराम गजाकोष यांनी नमूद केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ढोर समाजातील महिला, युवक तथा जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. ज्यामध्ये रवी मस्के, सूर्यकांत साबणे, गणेश खरटमोल, योगेश इंगळे, राजेश इंगळे, अमोल खरटमोल, दिगंबर खरटमोल, अनिल कावळे, बालाजी इंगळे , दर्शन खरटमोल आदींचा सहभाग होता.

