नांदेड : नांदेड येथील बस स्थानक बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या कंट्रोल रूमला अज्ञात व्यक्तीकडून फोन करून नांदेड बस स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला गँगचा शार्प शूटर असल्याचेही सांगितल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करत अंबाजोगाई येथून सलीम शेख चांदपाशा या आरोपीला अटक केली.
नांदेड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून धमकी देण्यामागील नेमके कारण काय आहे याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

