अंबाजोगाई (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे होत असताना संस्कार भारतीच्या वतीने शहरातील खोलेश्वर माध्यमिक शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या राष्ट्र आराधना कार्यक्रमाला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संघ स्थापनेपासून राष्ट्र भक्ती तथा जनहितासाठी प्रेरणा देणार्या वेगवेगळ्या गीताचे सादरीकरण संस्कार भारतीच्या गायकांनी केले. सेवा हा यज्ञकुंड, समीधा सम हम जले, तर विश्व मौन साधना के हम है मौन पुजारी अशा राष्ट्र भक्तीपर संघ कार्यकर्त्याने रचित केलेले संगीत पद्य कार्यक्रमात सादर झाली. दरम्यान राष्ट्र निर्माण कार्यात संघाचा पुढाकार कमालीचा असुन समाजामध्ये जनजागृती करताना संघ विचाराची बीजे रोवली जावीत या उद्देशाने संस्कार भारतीने आयोजित केल्याचे प्रतिपादन संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलता पाठक यांनी केले. या कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता तथा आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवारजी, श्री.गोळवलकर गुरूजी यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. विभाग संघचालक उत्तमराव कांदे, डॉ.शरदराव हेबाळकर, पंडित उद्धवराव बापू आपेगावकर, जिल्हा कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, तालुका संघचालक निवृत्तीराव दराडे, परळीचे तालुका संघचालक रतनजी कोठारी, डॉ.अतुलदादा देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून डॉ.देशपांडे यांनी राष्ट्र आराधना कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. प्रसंगी बोलताना स्नेहलता पाठक म्हणाल्या की, संस्कार भारतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतो. समाज प्रबोधन असो किंवा जनकल्याणाचं कार्य असो संघ विचाराची बीजं लोकांमध्ये रूजविल्या गेली तर एक सक्षम राष्ट्र, समाज निर्माण होवु शकतो. संघ विचार हा खर्या अर्थाने राष्ट्राला दिशा देणारा असून 100 वर्षांत संघ विचारांप्रती असलेला कृतज्ञता भाव जागृत करण्यासाठी राष्ट्र आराधना उपक्रमाचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. दोन तासांच्या या कार्यक्रमात संस्कार भारतीच्या गायक कलाकारांनी विविध प्रेरक संघ गीतांचे गायन केले. तर शहरातील नगरसेविका सौ.सुचिता अतुलराव देशपांडे यांनी सुंदर संघ गीताचे गायन केले. जयेंद्र कुलकर्णी, शैलेष पुराणिक, सौ.लता पत्की, सौ.मधुरा बाभुळगावकर, सौ.विडेकर, श्रावणी कुलकर्णी, यशश्री गुट्टे, प्रफुल्ल दहिवाळ आदींनी संघ गीते गायिली तर प्रा.रत्नदीप शिगे, भगवंत पाठक, श्री.रामदासी यांनी तबला व बासरीवर साथ दिली. या कार्यक्रमाला माजी प्राचार्य राजाभाऊ धाट, भा.शि.प्र संचालक विष्णुपंत कुलकर्णी, डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षाताई मुंडे, राम कुलकर्णी, सौ.शरयूताई हेबाळकर, माजी प्राचार्य अ.द.पत्की, डॉ.नितीनराव धर्मराव, प्रा.अविनाशराव जोशी, डॉ.गोपाळराव चौसाळकर, विभाग प्रचारक भरतजी देशपांडे, डॉ.प्रसाद कुलकर्णी, अॅड.जयदिप विर्धे, गोविंद पांचाळ आदींसह प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.शाम बारडकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास शहरातील 400 पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती.

