धानोरा खुर्द परिसरात अवकाळी पाऊस
अंबाजोगाई ( प्रतिनिधी)-अशोक कोळी यांजकडून
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात ता. १९ गुरुवार रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाला असून गारा देखील पडल्या आहेत. रब्बी हंगामातील शेतात कापणी केलेले हरभरा गहू ज्वारी भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमनाथ बोरगाव येथे वीज पडून हरभऱ्याचा ढीग जळून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

धानोरा खुर्द परिसरातील आपेगाव, तट बोरगाव, अंजनपूर,कोपरा,सोमनाथ बोरगाव, देवळा,माकेगाव,ममदापूर, पाटोदा,अकोला या गावात अवकाळी पाऊस झाला. काही गावात गारा देखील पडल्या या अवकाळी पावसामुळे शेतात कापणी केलेले आणि उभा असलेल्या हरभरा गहू ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. अचानक पाऊस आल्यामुळे ऊसतोड मजुराची तारांबळ उडाली. मांजरा पट्ट्यात अजूनही ऊसतोड सुरू असून या पावसामुळे ऊस भरलेली वाहने शेतात उभी आहेत. अवकाळी पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याची देखील फळझड होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वीज पडून हरभऱ्याचा ढीग जळाला
सोमनाथ बोरगाव येथील शेतकरी शिवकन्या हरिश्चंद्र येडे यांच्या दोन एकर मधील शेतातील कापणी करून ढीग लावलेला हरभऱ्याचा ढीग वीज पडून जळून नुकसान झाले आहे.

