इतिहासाशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा पूर्ववत शालेय अभ्यासक्रमात घ्या – अभिजीत लोमटे

“NCERT ने इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे इतिहासाची छेडछाड कदापि सहन केली जाणार नसून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा पूर्ववत पाठ्यपुस्तकात घ्यावा अशी मागणी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी केली आहे.
मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे. राजस्थानातील मोहिमा याचे ठळक उदाहरण आहेत रामपुरा मोहिम, बुंदीतील हस्तक्षेप, कक्कोरचे युद्ध, पाटन आणि मेर्टा येथील विजय… या सर्व घटनांमधून मराठ्यांची युद्धनीती, धाडस आणि उत्तर भारतातील प्रभाव स्पष्ट दिसतो.
अनेक राजपूत राज्यांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. मग असा सत्य इतिहास अभ्यासक्रमातून कमी करणे किंवा हटवणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही.
इतिहास हा कोणत्याही दबावाखाली बदलला जाऊ नये, तर तो पुराव्यांच्या आधारे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा उगवण्याचा जो निर्णय घेतला आहे आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. हा केवळ इतिहास नाही, आमचा स्वाभिमान आहे त्यामुळे इतिहासाशी छेडछाड आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही तात्काळ मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा पूर्ववत शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात घ्यावा अन्यथा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी सचिव,जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात दिला आहे.

