आयटी क्षेत्रात तरूणांना चांगली संधी – रावसाहेब घुगे

अंबाजोगाईत वार्ता समुहाचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा
अंबाजोगाई (प्रतिनिधी) प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच ए.आय तंत्रज्ञानाचा मोठा शोध असल्याचे मत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. आगामी काळात याला महत्व असणार आहे, पण त्याचे दुष्परिणाम हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयटी क्षेत्रात तरूणांना चांगली संधी आहे. त्यामुळे कौशल्याचा वापर करून या क्षेत्रात आपल्याला झेप घेता येत असल्याचे बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी सांगितले. दोन्ही मान्यवर अंबाजोगाई येथील दैनिक वार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. अंबाजोगाई शहरातील दैनिक वार्ता समुहाचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते. तर प्रमुख आर्कषण म्हणून एबीपी माझा व एबीपी न्युज हिंदीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, संगमनेर (जि.अहिल्यानगर) येथील बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी, धारूरचे नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, सौ.जानव्हीताई राजीव खांडेकर, गंगामाऊली शुगरचे व्हाईस चेअरमन हणमंतराव काका मोरे, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर व्यासपीठावर नगरभूषण पुरस्कार प्राप्त जळगावचे अप्पर पोलिस अधिक्षक अशोकराव नखाते, सदभावना पुरस्कार प्राप्त गौतमचंद सोळंकी, युवा गौरव पुरस्कार प्राप्त पुणे येथील युवा उद्योजक सुशिल सुरेशराव गाडवे, सेवागौरव सन्मान प्राप्त अंबाजेागाईचे उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांच्यासह दैनिक वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्रोपतीबाई भगवानराव गित्ते यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, अंबाजोगाई शहरातील कला प्रेमी व साहित्यप्रेमी स्व.भगवानराव बप्पा शिंदे, पत्रकार मित्र नागनाथ वारद व परिसरातील दरम्यानच्या काळात निधन पावलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना सभागृहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संपादक परमेश्वर गित्ते यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहरातील जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. ज्यांनी अंबाजोगाई शहराच्या बाहेर म्हणजे भारतात किंवा देशाबाहेर उत्कृष्ठ काम करून या शहराचा लौकिक वाढविला आहे. अशांचा वेगवेगळे पुरस्कार देवून सन्मान करण्याची परंपरा गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. येणार्या काळात देशातील व राज्यातील मान्यवर वक्त्यांनी निमंत्रित करून त्यांचे अनमोल विचार नव्या पिढीला पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू त्यासाठी जे मान्यवर उपस्थित राहतील त्यांच्यासाठी राजीव खांडेकर यांनी शिफारस करावी. अशी अपेक्षा व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले एबीपी माझा व एबीपी न्युज हिंदीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी बोलताना सांगितले. की, बीड जिल्हा हा माझ्यासाठी आदराचे स्थान आहे. कारण, याच जिल्ह्याने मला धर्मपत्नी दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्याशी माझी जवळीकता आहे. अंबाजोगाई शहर हे कोहीनूर हिर्यांची खान आहे. आज मला इथे सकारात्मकता जाणवत आहे. आज इथे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे मंडळी आहेत. इथे फेटा बांधणारे पण, बुमराह सारखी नजर रोखून फेटा बांधल्याचे ते म्हणाले. आजच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते अशा मंडळींना ऐकण्याची संधी आज परमेश्वर गित्ते यांच्यामुळे भेटल्याचे खांडेकर म्हणाले. आज अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. येणार्या काळामध्ये असणार आहेत. ए.आय आता महत्वाचा आहे, आपण त्याला टाळू शकत नाही असे खांडेकर म्हणाले. देवांग मेहता यांनी आधीच सांगितले होते की, मोबाईल आपल्या आयुष्याचा भाग बनणार आहे. प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा होता तितकाच मोठा शोध ए.आयचा आहे. गुगलने बारामतीत शेतीवर प्रयोग केले. त्यांनी शेतात ए.आय चा वापर करण्यास सांगितले. शेतात ए.आयचा वापर होऊ लागला आहे. वार्याची दिशा, पिकावरील कीड, पिकाला किती पाणी हे मोबाईलवर समजणार आहे. एकरी शंभर टन ऊसाचे उत्पन्न होणार असल्याचे खांडेकर म्हणाले. ए.आयचे दुष्परिणाम देखील होणार आहेत. यामुळं नोकर्यावर परिमाण होणार आहे. माणसाची कामं यंत्र करायला लागली तर परिस्थिती बदलणार असल्याचे राजीव खांडेकर म्हणाले. अर्जून देशपांडे यांचा कट्टा पहा तो २५ वर्षांचा आहे. त्याने जेनरिक औषधांवर काम सुरू केलं. अर्जुनने जेनरिक आधार नांवाची कंपनी सुरू केली. रतन टाटाने याची बातमी वाचली. त्यानंतर ते त्याचे मेंटॉर बनले. त्यांची १६०० मेडिकल होती. त्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही केलं आहे. स्ट्राँग आयडिया असल्यास हे शक्य असल्याचे खांडेकर म्हणाले. संजू राठोड यांचे गुलाबी साडी गाणं दोन वर्षे टॉप फिफ्टी मध्ये होतं. म्हशी घेऊन दूध विकायचं स्वप्न होतं सोबत गाणं लिहायचं आणि म्हणायचा छंद होता. त्यांच्या भावाने म्युझिक दिलं त्याच्या गाण्याला यूट्यूबकडून पैसे मिळाले. गुलाबी साडीचा चमत्कार. तो स्टेशनवर राहिलेला मुलगा गाणे गाऊ लागला. तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला तर ते सार्थकी लागतं. त्याला अनंत अंबानींच्या लग्नाचा आमंत्रण मिळालं असे खांडेकर म्हणाले. कॉम्प्युटर आल्यावर कम्प्युटरवरच्या कुंडल्या विकायला सुरूवात झाली. आपण जसे मोबाईल वापरतो. तसे जगात इतर लोक मोबाईल वापरत नाहीत. मला विदेशात मोबाईल वापरणारे लोक सापडले ते ९० टक्के भारतातलेच होते. मनोरंजन स्थायीभाव झालेला आहे. मज्जा करणं स्वभाव झालाय, सण कमी होते म्हणून मदर्स डे, फादर डे आपण करीत आहोत. मनाचे रंजन करण्यात आपण धन्यता मानत आहोत असे खांडेकर म्हणाले. मोबाईलबद्दल मुलांना शिकविण्यापेक्षा आई-बापाला शिकवले पाहिजे. आपल्याकडे आई-बाप होण्यासाठी क्वॉलिफिकेशन नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अंबाजोगाईत हे प्रश्न कमी असतील अशी मी अपेक्षा करतो असे खांडेकर म्हणाले. तर कार्यक्रमाचे दुसरे आकर्षण असलेले बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे बोलताना म्हणाले की, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून शिक्षण घेत मुंबई सारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतले. या प्रवासात अनेक प्रवासी भेटले. ज्याचा परिणाम माझ्या स्वतःच्या आयुष्यावर आणि व्यक्तिमत्वावर झाला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसांकडून वेगवेगळे शिकायला मिळाले. आज समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजलेला आहे. शासनाचा प्रत्येक विभाग हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. व्यवस्था बदलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जो कोणी माझ्या सारखा पुढे येईल. त्याचे हजार दुश्मन तयार होतात. एक काम दोन दिवसांत होते. आणि तेच काम चार महिन्यांत सुद्धा होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. सामाजिक जगणे आणि वास्तविकता यात तफावत असल्याचे सांगत आपण संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या ठिकाणी बाप नांवाची आयटी कंपनी स्थापन करून त्या ठिकाणी गोर-गरीबांच्या व सर्व सामान्यांच्या मुलांना स्वॉफटवेअर डेव्हलपर्स कंपनीमध्ये नौकरीची व शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही कंपनी वशिल्यावर किंवा ओळखीवर चालणारी नाही. तर ही कंपनी माईंड गेमवर चालणारी कंपनी आहे. त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी आपले कौशल्य व वेगळेपणा दाखवावा लागेल. तरच भविष्याची वाटचाल सुकर होईल. आयटी क्षेत्रात भरपूर संधी आहेत. ज्यांना त्या संधीचे सोने करता येईल. तोच पुढे जाणार असल्याचे रावसाहेब घुगे यांनी सांगितले. अंबाजोगाई शहरामध्ये दैनिक वार्ता समुहाने समाजातील वेगवेगळ्या घटकांना सामावून घेत त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. वार्ता समुहामुळे अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो तरूणांशी संवाद साधण्याचे संधी आपणांस मिळाली असल्याचे घुगे यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, अंबाजोगाई शहरामध्ये वार्ता समुहाने सातत्याने सकारात्मक बाबींना प्राधान्य देवून त्यांचा सन्मान सत्कार केला आहे. अंबाजोगाई शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मंडळी आहे. त्या मंडळींच्या कामाचे कौतुक करून त्यांचे काम व त्यांची तपश्चर्या समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे. या शहराने आमच्या परिवारावर अतोनात प्रेम केले असून त्याची उतराई होणे शक्य नसल्याचे मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार गोविंद महाराज केंद्रे यांनी मानले. उपस्थितांचे सहर्ष स्वागत गायक सुभाष शेप व गायिका मयुरी मजगे यांच्या संगीत संचाने केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ.भा.मराठी पत्रकार परिषद, शाखा अंबाजोगाई, पत्रकार संघ अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा अंबाजोगाई, अ.भा.मराठी डिजीटल पत्रकार संघ, अंबाजोगाई, गुड मॉर्निंग ग्रुप, अंबाजोगाई, व्हाईस ऑफ मिडीया शाखा अंबाजोगाईच्या सर्व पदाधिकार्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई, परळी, धारूर, केज व पंचक्रोशीतून विविध क्षेत्रातील मान्यवर, असंख्य नागरिक, बंधू-भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

