
परळी वैजनाथ : (प्रतिनिधी) परळी शहरातील मोंढा भागात संकटमोचन हनुमान मंदिराजवळ महेश सिनियर सिटीझन ग्रुप परळी वैजनाथ परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक, प्रवासी व कामगार यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तहानलेल्या प्रत्येक व्यक्तीस थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही अत्यंत समाजोपयोगी व सेवाभावी कृती मानली जाते. महेश सिनियर सिटीझन ग्रुपने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत राबविलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले.

समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजसेवेची ही परंपरा पुढेही अशीच अखंड सुरू राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी, माजी नगरसेवक पांडुरंग सोनी, बाजार समिती संचालक जयपाल लाहोटी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड ,महेश सिनियर सिटीझन ग्रुप चे पदाधिकारी,जेष्ठ नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

